चांदवड : बहादुरी येथील विवाहिता कल्याणी संतोष शिरसाठ (३५) हिने आत्महत्या केल्याने संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी कल्याणीच्या सासरच्या अंगणातच तिचा अंत्यविधी केला. सासरच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून कल्याणीने आत्महत्या केल्याची फिर्याद माहेरच्यांकडून दाखल झाल्याने वडनेरभैरव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत सुभाष जाधव (५३, रा. गोहरण, ता. चांदवड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०१४ मध्ये कल्याणीचा संतोष दत्तात्रय शिरसाठ यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर १९ मे २०१४ पासून १९ जुलै २०२५ पर्यंत कल्याणीला तिचा पती व सासरच्या मंडळींनी वेळोवेळी विविध कारणांमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. या त्रासामुळे अखेर कल्याणीने शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास विहिरीत आत्महत्या केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या आत्महत्येस जबाबदार म्हणून पती संतोष शिरसाठ, सासरे दत्तात्रय दगू शिरसाठ व सासू चंद्रकला दत्तात्रय शिरसाठ (सर्व रा. बहादुरी, ता. चांदवड) यांची नावे फिर्यादीत टाकण्यात आली आहेत. त्यावरून वडनेरभैरव पोलिसांनी तीनही संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याणीच्या संतप्त नातेवाईकांनी तिच्या सासरच्या अंगणात रविवारी दुपारी ३ वाजता तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कल्याणीच्या अंत्यविधीस पती, सासरा व सासू उपस्थित नव्हते. मात्र, तिचा दहा वर्षांचा मुलगा युग व तीन वर्षीय मुलगी अनुश्री उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक ए. बी. पवार या गुन्ह्याचा तपास करत आहेत. या घटनेमुळे पंचक्रोशीतील गावात हळहळ व्यक्त होत आहे.


