रत्नागिरी : कोकण रेल्वेने कोलाड आणि वेर्णादरम्यान रो-रो कार वाहतूक सेवा सुरू केली. गणेशोत्सवाच्या आधी ही सेवा सुरू केल्याने खासगी कारचालकांसाठी वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या सेवेसाठीचे बुकिंग हे २१ जुलैपासून सुरू झाले असून १३ ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. १९९९ पासून भारतात रोल-ऑन रोल-ऑफ (रो-रो) सेवांचा प्रणेता असलेल्या कोकण रेल्वे कॉपेरिशन लिमिटेडने कोलाड (महाराष्ट्र) आणि वेर्णा (गोवा) दरम्यान नवीन रो-रो कार सेवा सुरू केली आहे.
ही नवीन सेवा लांब पल्ल्याच्या कार प्रवासासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार आहे. या सेवेचे आरक्षण नवी मुंबईतील बेलापूर येथील मुख्य वाणिज्य व्यवस्थापक कोकण रेल्वे महामंडळाच्या कार्यालयात किंवा वेर्णा रेल्वे स्टेशन, गोवा येथे करता येणार असल्याचे कोकण रेल्वेने सांगितले.
अशी असणार सेवा
विशेष डिझाईन केलेल्या रेकमध्ये प्रत्येक ट्रिपमध्ये ४० गाड्या असतील. ज्यामध्ये २० वॅगनपैकी प्रत्येकी दोन गाड्या लोड केल्या जातील. मालवाहतूक शुल्क प्रतिकार जीएसटीसह ७,८७५ रुपये आहे. बुकिंगच्या वेळी ४ हजार रुपये शुल्क भरावे लागेल आणि उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी भरावी लागेल. तसेच संलग्न तीन एसी कोचमध्ये किवा दुसऱ्या सीटिंग कोचमध्ये प्रत्येक गाडीत तिघे प्रवास करू शकतात.
२३ ऑगस्टपासून सेवा
नवीन रो-रो कार सेवा ही २३ ऑगस्टपासून कोलाड आणि २४ ऑगस्टपासून वेर्णा येथून सुरू होईल. ११ सप्टेंबरपर्यंत दोन्ही दिशेने पर्यायी दिवशी चालेल. ही सेवा कोलाड आणि वेर्णादरम्यान धावेल. सायंकाळी ५ वाजता वाहतूक सुरू होत दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता वाहतूक पूर्ण होईल. प्रवाशांना दुपारी २ पर्यंत म्हणजेच प्रस्थानाच्या तीन तास आधी सुरुवातीच्या स्टेशनवर रिपोर्टिंग करावे लागेल.


