पुणे: पुण्यात अधिकारी असलेल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी क्लास वन अधिकाऱ्याने घरातच स्पाय कॅमेरा बसवला. त्या कॅमेरेच्या माध्यमातून पत्नीच्या आंघोळीचा व्हिडीओ शूट करून तिला ब्लॅकमेल करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आली आहे. या प्रकरणी पत्नीने संबंधित क्लास वन अधिकाऱ्याबरोबर सासरच्या सात जणांवर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंघोळीचे हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित अधिकारी त्याच्या पत्नीकडून माहेरून गाडी आणि कारच्या हप्त्याकरिता दीड लाख रुपये आणण्यासाठी दबाव टाकत होता. 2020 मध्ये पीडित महिलेचे लग्न झाले होते. त्यानंतर दोघांचा संसार सुखाचा सुरु होता. परंतु, काही वर्षात पतीला पत्नीवर संशय आला. त्यानंतर त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली आणि वारंवार पैशाची मागणी करत होता. तसेच तिच्यावर नजर ठेवण्यासाठी घरात स्पाय कॅमेरेदेखील बसवून घेतले होते.
संबंधित अधिकारी ऑफिसमध्ये गेल्यावर त्याच्या क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीवर नजर ठेवायचा. त्यानंतर या अधिकाऱ्याने स्वतःच्या बाथरूममध्ये देखील स्पाय कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यांनी पत्नीचे आंघोळीचे व्हिडीओ त्याने रेकॉर्ड केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर आंघोळीचे रेकॉर्ड केलेले व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्याने पत्नीला दिली. घर आणि गाडीच्या हफ्त्यासाठी दीड लाख रुपये माहेरून आणण्यासाठीही त्याने जबरदस्ती केली. हा अधिकारी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पत्नीला ब्लॅकमेल करत होता.
पतीकडून मानसिक आणि शारिरीक छळ होत असल्याचा आरोप करत क्लास वन ऑफिसर असलेल्या त्या पत्नीने पोलिसात धाव घेतली आहे. फिर्यादीत स्पाय कॅमेराच्या व्हिडीओंचीही तक्रार देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.


