तिरुवनंतपूरम : शशी थरूर जोपर्यंत राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर आपली भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत तिरुवनंतपूरममधील पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना आमंत्रित करणार नाही, असे काँग्रेस ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री के मुरलीधरन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा विरोधातील पक्षातील असंतोष, खदखद अधिक उघड झाली.
विशेष म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर यांसह विविध मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसलेली असताना आता या प्रमुख विरोधीपक्षाकडून लोकसभेतील आपल्या एका प्रमुख नेत्यालाच बाजूला सारण्यात येत असल्याचे चित्र आहे. थरूर यांच्यावर भाजप समर्थक भूमिका घेण्याचा आरोप काँग्रेस नेते करत आहेत. एक दिवसापूर्वीच त्यांनी राजकीय पक्षापेक्षा देश सर्वोच्च असल्याची भूमिका मांडली होती. थरूर यांनी केरळातील मुख्यमंत्रीपदासाठी आपण सर्वाधिक पसंतीचे उमेदवार असल्याचा दावा करणारे एक सर्वेक्षणदेखील अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केले होते.


