मुंबई: नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. सोमवार १८ ऑगस्ट २०२५ रोजी ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.
ऐतिहासिक दस्तऐवज असलेली ही तलवार लिलावात निघाल्याची बातमी 28 एप्रिल 2025 रोजी समजताच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन ही तलवार शासनाला मिळावी, या दृष्टीने नियोजन करण्यात आले. दूतावासाशी संपर्क करुन स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री ॲड.शेलार यांनी याबाबतचे नियोजन व संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मंत्री ॲड.शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला.
महाराष्ट्र शासनातर्फे ज्या मध्यस्थीने हा लिलाव जिंकला होता, त्यांना लंडन येथे प्रत्यक्ष भेटून त्याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करुन आज मंत्री ॲड.शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली. अशा प्रकारे परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळवण्याची ही पहिलीच वेळ असून अनेक पराक्रमांची साक्षीदार असलेली ही ऐतिहासिक तलवार आपल्या ताब्यात घेण्याचे भाग्य मला लाभले. तमाम महाराष्ट्राचा हा एक ऐतहासिक विजय आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.


