नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, शरद पवार आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली. यामुळे उपराष्ट्रपती निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी आणि एनडीएचे सीपी राधाकृष्णन यांच्यात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत चुरशीची लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट आहे.
कोण आहेत बी. सुदर्शन रेड्डी?
8 जुलै 1946 रोजी तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात जन्मलेल्या बी. सुदर्शन रेड्डी यांनी उस्मानिया विद्यापीठातून बी.ए. आणि एल.एल.बी. पदवी प्राप्त केली. 27 डिसेंबर 1971 रोजी आंध्र प्रदेश बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणीकृत झालेल्या रेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात रिट आणि सिव्हिल प्रकरणांमध्ये वकिली केली.
1988-90 दरम्यान ते उच्च न्यायालयाचे सरकारी वकील होते, तर 1990 मध्ये त्यांनी केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी वकील म्हणून सहा महिने सेवा दिली. उस्मानिया विद्यापीठाचे कायदेशीर सल्लागार आणि स्थायी वकील म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
2 मे 1995 रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 5 डिसेंबर 2005 रोजी ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आणि 12 जानेवारी 2007 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. 8 जुलै 2011 रोजी ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी गोवाचे पहिले लोकायुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली.
इंडिया आघाडीचा बिनविरोध निवडणुकीला नकार
एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नेते सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बिनविरोध निवडणुकीसाठी विरोधी पक्षांशी चर्चा केली होती. मात्र, इंडिया आघाडीने हा प्रस्ताव फेटाळत स्वतःचा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी सांगितले की, सर्व विरोधी पक्षांनी एकमताने सुदर्शन रेड्डी यांच्या नावाला पाठिंबा दिला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी आप आणि इतर पक्षांनीही या निर्णयाचे समर्थन केल्याचे नमूद केले.
द्रमुकने दक्षिण भारतातील उमेदवाराची मागणी केली होती, तर तृणमूल काँग्रेसने राजकारणाबाहेरील व्यक्तीला उमेदवारी देण्यावर भर दिला. विरोधी पक्षांनी एनडीएच्या उमेदवाराला संघाशी संबंध असल्याचा आक्षेप घेत सुदर्शन रेड्डी यांच्यासारख्या कायदेशीर क्षेत्रातील दिग्गजाला पुढे केले आहे.


