Car Catches Fire in Nagpur: नागपूरमधील सिव्हिल लाईन्स परिसरात जिल्हा सत्र न्यायालयाजवळ एका कारला अचानक आग लागल्याने परिसरात घबराट पसरली. गाडीने धूर सोडण्यास सुरुवात केली आणि काही क्षणांतच ती जळून खाक झाली. न्यायालयात कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने धूराचे लोट पाहून तातडीने अग्निशमन विभागाला कळवले. नागपूर अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, गाडीचे संपूर्ण नुकसान झाले. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि तपास सुरू आहे.
मुंबईतील घाटकोपरमध्ये अपघात
मुंबईतील एलबीएस रोडवर पहाटे एक वेगवान कार बॅरिकेड तोडून फूटपाथवर आदळली. या कारने फूटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. कार गुजरात नोंदणी क्रमांकाची होती. अपघातात एटीएमचे दार आणि काचाही फुटल्या. कारमध्ये दोन तरुणी आणि एक पुरुष होता. याप्रकरणी स्थानिकांनी दारू पिऊन गाडी चालविल्याचा संशय व्यक्त केला आहे. चालक अपघातस्थळावरून फरार झाला, तर दोन महिला प्रवाशांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पोलिसांकडून तपास सुरू
दरम्यान, कारमधून दारूच्या बाटल्या आणि ग्लास मिळाल्याने पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दोन्ही घटनांचा पोलिस तपास करत आहेत.


