Malkapur Accident: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर परिसरात आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की काही क्षणांतच चार जणांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमींना तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
हा अपघात पहाटे अंदाजे तीनच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मलकापूर MIDC पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे आणि अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.


