Bhandara Crime: भंडारा शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फेसबुकवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत दोन तरुणांनी 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपींची नावे प्रज्वल पांडे (27) आणि मोहित बांते (29) अशी आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, प्रज्वल आणि पीडित तरुणीची ओळख फेसबुकवर झाली होती. त्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री केली आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवत अनेकदा भेट घेतली. मात्र, तरुणीने त्याच्या शारीरिक संबंधाच्या मागणीस नकार दिला होता. 20 सप्टेंबरच्या रात्री, प्रज्वलने तरुणीला घरी सोडण्याचे कारण सांगून दुचाकीवर बसवले आणि तिला कॅनल रोडवर नेले.
तिथे त्याने त्याला गुंगी आणणारे पेय दिले. पीडिता बेशुद्ध पडल्यावर त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याच वेळी मोहित बांते तेथे पोहोचला आणि त्यानेही पीडितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध केला असता, दोघांनीही तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडितेने थेट भंडारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार निवारण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवला. त्यानंतर तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. भंडारा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


