नवी दिल्ली : भारतात सध्या ऑनलाईन व्यवहारांची संख्या वाढताना दिसत आहे. स्मार्टफोनवर QR कोड स्कॅन करून UPI पेमेंट करता येऊ शकते. मात्र, ज्यांच्याकडे मोबाईल फोन नाही त्यांची अडचण होत होती. आता अशा लोकांसाठी, स्टार्टअप ‘प्रॉक्सी’ने थंबपे नावाचे प्रॉडक्ट्स लाँच केले. जे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरून पेमेंट करण्यास परवानगी देते.
तुम्ही फक्त तुमच्या अंगठ्याच्या ठशाचा वापर करून दुकाने, पेट्रोल पंप आणि शोरूममध्ये पेमेंट करू शकता. ही प्रणाली आधार ऑथेंटिकेशनला UPI शी जोडते. फोन, कार्ड किंवा वॉलेट कनेक्ट करण्याची आवश्यकता नाही. पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना फक्त डिव्हाइसवर त्यांचा अंगठ्याचा ठसा ठेवावा लागतो. थंबपे वापरून पेमेंट करण्यासाठी, ग्राहकांना त्यांचा अंगठ्याचा ठसा डिव्हाइसवर ठेवावा लागतो, जो नंतर स्कॅन केला जाईल.
त्यानंतर आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS) सिस्टम प्रथम अंगठ्याचा ठसा वापरून व्यक्तीची पडताळणी करते. एकदा प्रमाणीकरण पूर्ण झाले की, UPI सिस्टिम बँक-टू-बँक पेमेंट पूर्ण करेल. ग्राहकांना QR कोड, स्मार्टफोन किंवा रोख रकमेची आवश्यकता भासणार नाही.
सुरक्षा आणि स्वच्छतेकडेही लक्ष
कंपनीने सांगितले की, या डिव्हाइसमध्ये फसवणूक शोधण्यासाठी प्रमाणित फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. पडताळणीसाठी त्यात एक लहान कॅमेरा देखील आहे. स्वच्छतेसाठी UV निर्जंतुकीकरण देखील प्रदान केले आहे.


