12th class Exam Form: महाराष्ट्रातील सुमारे 20 जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसाने आणि महापुराने शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचेच जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकरी, मजूर, व्यावसायिक आणि कारागीर यांना या आपत्तीने जबर फटका बसला आहे. शेती, घरे, जनावरे आणि मुलांची शैक्षणिक साधने वाहून गेल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
या पार्श्वभूमीवर, 12वीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मूळतः 29 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती, परंतु पुरामुळे हजारो विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नव्हते. विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर होत असलेली अडचण लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुदतवाढ जाहीर केली असून शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना आवश्यक ती सूचना देण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, पूरामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. तिवृष्टी आणि पुरामुळे केवळ शेतीचे नुकसान झाले नाही, तर जनावरे, घरे आणि गावांमधील छोट्या व्यवसायांवर देखील या आपत्तीचा मोठा परिणाम झाला आहे.


