Tukaram Mundhe: आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडाडीच्या निर्णयक्षमतेसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी (IAS) तुकाराम मुंढे पुन्हा एकदा नव्या भूमिकेत दिसणार आहेत. राज्य सरकारने त्यांची अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली असून, ते आजच या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे, तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील ही २५ वी बदली ठरली आहे.
दीड महिन्यांतच पुन्हा बदली
मुंढे यांची अवघ्या दीड महिन्यांपूर्वीच दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. मात्र, तिथे फार काळ न ठेवता सामान्य प्रशासन विभागाने पुन्हा एकदा त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. आता त्यांच्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
‘एफडीए’ मधील भ्रष्टाचाराला चाप लावणार?
गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन विभाग लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांमुळे प्रचंड चर्चेत आहे. अशा वादग्रस्त ठरलेल्या विभागात आता तुकाराम मुंढे यांच्यासारख्या डॅशिंग अधिकाऱ्याची एन्ट्री झाल्याने, विभागातील भ्रष्ट साखळीचे धाबे दणाणले आहेत. या नव्या पदावर मुंढे काय ‘ॲक्शन’ घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिव्यांग विभागातील ‘ती’ कारवाई
यापूर्वी दिव्यांग कल्याण विभागात आयुक्त म्हणून कार्यरत असताना तुकाराम मुंढे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवून सरकारी नोकरी लाटणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मोठी कारवाई केली होती. मात्र, ही साफसफाई मोहीम सुरू असतानाच ३१ मार्च रोजी अचानक त्यांची तिथून बदली करण्यात आली, ज्यामुळे ती कारवाई थंडावली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागात गेलेल्या मुंढे यांना दीड महिना पूर्ण होण्याआधीच आता नव्या विभागात पाठवण्यात आले आहे.


