मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर सोमवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला. वरळी कोस्टल रोडवरील डिव्हायडर तोडून एक इर्टिगा गाडी 30 फूट खोल समुद्रात कोसळली. गाडीने काही क्षणांत समुद्राचा तळ गाठला, परंतु सुदैवाने चालक फ्रशोगर दरायुश बत्तीवाला (वय 28) याला महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत वाचवले. किरकोळ जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वरळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, चालक महालक्ष्मीहून वरळीकडे वेगाने गाडी चालवत होता. यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती डिव्हायडरला धडकली आणि थेट समुद्रात पडली. चालकाने मद्यप्राशन केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे. गाडी अजूनही समुद्रात असल्याची माहिती आहे.
एक महिन्यापूर्वी पोलीस हवालदाराचा झालेला मृत्यू
यापूर्वी, 9 सप्टेंबर 2025 रोजी वरळी सी-लिंक आणि कोस्टल रोडच्या कनेक्टिंग पॉईंटजवळ झालेल्या अपघातात वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार दत्तात्रय कुंभार यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात एका भरधाव कारने व्हीआयपी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना धडक दिली होती, या अपघात एक महिला पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाली होती.


