नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग सोमवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी ४.१५ वाजता विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेऊन मतदारयादींच्या विशेष तीव्र पुनरीक्षणची देशव्यापी वेळापत्रक जाहीर करणार आहे. हा निर्णय आजपर्यंतचा सर्वात मोठा असून, आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह सिंधू आणि विवेक जोशी या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या टप्प्यात १० ते १५ राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू होईल, ज्यात २०२६ च्या विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करणारी पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी यांचा प्रामुख्याने समावेश असेल.
विशेष तीव्र पुनरीक्षण ही प्रक्रिया मतदारयाद्यांना अद्ययावत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यात नवीन मतदारांची नोंदणी, मृत व्यक्तींची नावे काढणे, दुबार नावे रद्द करणे आणि यादीतील इतर त्रुटी दुरुस्त करणे यांचा समावेश आहे. बिहारमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७.४२ कोटी मतदारांची यादी तयार झाली, यामध्ये अनेक अवैध नावे काढली गेली.
आयोगाने अलीकडेच दोन बैठका घेऊन राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत SIR ची तयारी तपासली असून, अनेक राज्यांनी जुनी मतदारयादी ऑनलाइन उपलब्ध केली आहे. उदाहरणार्थ, दिल्लीची शेवटची SIR २००८ मध्ये आणि उत्तराखंडची २००६ मध्ये झाली होती. ही प्रक्रिया विशेषतः परदेशी घुसखोरांच्या नावांचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरेल, ज्यामुळे निवडणुकांची शुद्धता राखली जाईल.
पहिल्या टप्प्यात कोणती राज्ये?
पहिल्या टप्प्यात पाच प्रमुख राज्यांना प्राधान्य दिले जाणार असून, त्यात आसाम आणि पुद्दुचेरी वगळता उर्वरित चार राज्यांमध्ये (पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू) इंडिया आघाडीचे पक्ष सत्तेत आहेत. विरोधी पक्षाने बिहारमध्ये आयोगावर ‘मतचोरी’चे आरोप केले होते, जे सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. आता देशभरात SIR सुरू होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. तमिळनाडूत ही प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होईल, असे मद्रास हायकोर्टाला आयोगाने कळवले आहे.
महाराष्ट्रात कधी होणार?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (पंचायत, महानगरपालिका) निवडणुका सुरू असल्याने आयोगाकडे वेळेची कमतरता आहे. ३० जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणुका पार पाडाव्या लागणार असल्याने महाराष्ट्रासह इतर अशा राज्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात ही प्रक्रिया राबवली जाईल. मात्र, महाराष्ट्रात मतदारयादीतील कथित घोळावरून मोठा वाद सुरू आहे.
विरोधी पक्षांनी ‘मतचोरी’चा आरोप करत १ नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘यादी स्वच्छ न झाल्यास निवडणुका घेऊन दाखवा’ असे आव्हान दिले आहे. काँग्रेसनेही डिजिटल मतदारयादीची मागणी केली होती, पण आयोगाने ती ‘कायदेशीरदृष्ट्या शक्य नसल्याचे’ सांगितले.


