Pune Crime: पुण्यातील कुख्यात आंदेकर आणि कोमकर टोळीतील टोळीयुद्ध (गँगवॉर) पुन्हा एकदा पेटले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने थेट तुरुंगातूनच सूडचक्र फिरवले असून, बुधवारी सकाळी धनकवडी जवळील बालाजीनगर परिसरात एकावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील एका मुख्य आरोपीचा भाऊ असल्याचे समोर आले आहे.
या खळबळजनक घटनेमुळे पुणे पुन्हा एकदा हादरले असून, पोलिसांच्या सुरक्षेवर आणि गुन्हेगारांवरील वचक यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जेलमधून फिरवली सूत्रे; अल्पवयीन मुलांचा वापर
वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर त्यांचे वडील बंडू आंदेकर, त्यांची मुलगी आणि सून सध्या कारागृहात आहेत. असे असूनही, बंडू आंदेकरने जेलच्या भिंतींआडूनच आपल्या टोळीची सूत्रे हलवून या नव्या हत्येचा कट रचल्याचे बोलले जात आहे. आंदेकर टोळीने नेहमीप्रमाणे या गोळीबारासाठी अगदी कमी वयाच्या आणि तरुण मुलांचा (शूटर) वापर केल्याचे उघड झाले आहे.
आंदेकर विरुद्ध कोमकर: रक्ताळलेला इतिहास
आंदेकर आणि कोमकर टोळीतील वादाला २०२५ मध्ये हिंसक वळण लागले होते. या गँगवॉरची पार्श्वभूमी खालीलप्रमाणे आहे:
- पहिली घटना (२०२५): गणेशपेठ भागात बंडू आंदेकरचा मुलगा आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमागे वनराज यांच्याच बहिणीचा आणि मेहुण्याचा (कोमकर कुटुंब) हात होता.
- दुसरी घटना: या हत्येचा पहिला बदला म्हणून आंदेकर टोळीने वनराज यांच्या बहिणीचा मुलगा ‘आयुष कोमकर’ याला त्याच्या घराबाहेरच संपवले.
- तिसरी घटना: त्यानंतर काही दिवसांतच कात्रज-घोलेवाडी भागात कोमकर टोळीशी संबंधित आणि वनराज हत्याकांडातील आरोपीचा भाऊ ‘शिंदे’ याची हत्या करण्यात आली.
- चौथी घटना (आजची): आज बुधवारी सकाळी बालाजीनगरमध्ये अशाच प्रकारे आरोपीच्या दुसऱ्या एका भावाला लक्ष्य करत आंदेकर टोळीने चौथा खून केला.
तुरुंगात असूनही आंदेकरांचे वर्चस्व कायम?
बंडू आंदेकर, त्यांची सून लक्ष्मी आंदेकर आणि वनराज यांची पत्नी सध्या तुरुंगात आहेत. विशेष म्हणजे, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी तुरुंगात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयही मिळवला होता. आता बंडू आंदेकरने जेलमध्ये बसूनच हा तिसरा खून घडवून आणल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे, ज्यामुळे पुणे पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.


