Yavatmal Crime: यवतमाळ जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, पतीच्या ओरडण्यामुळे हा कट फसला, मात्र या घटनेने पांगडी गावात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन मोरे यांना आपली पत्नी कवडी मोरे हिचे गावातीलच विष्णू कडू याच्याशी अवैध संबंध असल्याचे समजले होते. यावरून घरात सतत भांडणे होत असत. आपल्या प्रेमाचा मार्ग मोकळा करण्यासाठी पत्नी आणि तिच्या प्रियकराने गजानन यांना कायमचे संपवण्याचे ठरवले.
नेमकं काय घडलं?
प्राप्त माहितीनुसाक, ३ मे रोजी रात्री २ च्या सुमारास गजानन मोरे गाढ झोपेत असताना, पत्नीने विजेच्या मुख्य बोर्डमधून ॲल्युमिनियमची तार ओढून तिचे दुसरे टोक पतीच्या शरीराला लावले. विजेचा जोरदार झटका बसताच गजानन मोठ्याने ओरडले आणि जागे झाले. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांच्या दंडाला गंभीर जखमा झाल्या असून ते भाजले गेले आहेत.
दोन्ही आरोपींना बेड्या
घटनेनंतर पीडित पतीने वडगाव जंगल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेली विजेची तार जप्त केली आहे. पत्नी कवडी मोरे आणि तिचा प्रियकर विष्णू या दोघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.


