मुंबई: राज्यात गेल्या काही वर्षांपासून वाढत्या वीजदरांमुळे प्रत्येक सरकाला सातत्याने जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच करोना महामारीमुळे लॉकडाऊन लावलेला असताना राज्यातील लाखो कुटुंबांना अनेक पटींनी अधिक वीजबिले भरावी लागली होती. तेव्हा तत्कालीन सरकारला देखील जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. विद्यमान महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी प्रचारकाळात वीज दर कमी करण्याबाबत घोषणा केली होती. दरम्यान, आज (दि. १०) राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पवार यांनी येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होतील, अशी घोषणा केली आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, “महावितरण कंपनीने राज्यात पुढील पाच वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होणार आहेत.”


