जळगाव: जळगाव आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसामुळे ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी किमान 10 गावे प्रभावित झाली आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, 452 घरे पाण्याखाली गेली असून सुमारे 2,500 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तथापी, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, नद्यांमधील पाणीपातळी वाढल्यामुळे गावांत पाणी शिरले असून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) बाधित भागांमध्ये पाणी व अन्नसहाय्य पुरवत आहे.
प्राप्त माहितीनुसार, 452 घरे पाण्याखाली गेली आहेत आणि गाळ साचल्याने सुमारे 2500 हेक्टर जमीन खराब झाली आहे. तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच जवळपास 1800 जनावरांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
राज्य सरकारची प्रतिक्रिया
दरम्यान, महाराष्ट्राचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बाधित भागांना भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 4 तहसीलमध्ये सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले आणि पिके वाहून गेली आहेत. आम्ही अधिकाऱ्यांना तातडीने सर्वेक्षण करून नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.


