IAS Nagarjuna Gowda: भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी डॉ. नागार्जुन बी. गौडा हे सध्या एका गंभीर वादात अडकले आहेत. हरदा जिल्ह्यातील एका रस्ते बांधकाम प्रकरणात शासनाच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार, एका कंपनीला 51 कोटींच्या ऐवजी केवळ 4,032 रुपयांचा दंड लावण्यात आल्याने या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
हरदाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण फूलपगारे यांनी 2023 मध्ये पाथ इंडिया या रस्ते बांधकाम कंपनीविरुद्ध कठोर कारवाई केली होती. कंपनीवर 3.11 लाख घनमीटर वाळू व मातीचे बेकायदेशीर उत्खनन केल्याचा ठपका ठेवत 25.83 कोटींचा दंड आणि तेवढ्याच रकमेचा पर्यावरण शुल्क असा एकूण 51.67 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.
मात्र फूलपगारे यांच्या बदलीनंतर, डॉ. नागार्जुन गौडा यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या प्रकरणात वेगळाच निकाल लागला. त्यांच्या आदेशानुसार, केवळ 2,688 घनमीटर एवढेच अवैध उत्खनन झाले असून, कंपनीला फक्त 4,032 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
RTI कार्यकर्ते आनंद जाट यांचे गंभीर आरोप
मध्य प्रदेशातील RTI कार्यकर्ते आनंद जाट यांनी या निर्णयावर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी दस्तावेजांच्या आधारे असा आरोप केला की 51 कोटींचा दंड इतक्या थोडक्या रकमेवर आणणे “संशयास्पद” आहे आणि यात आर्थिक अनियमिततेचा संशय आहे. “यामुळे राज्य सरकारचे कोट्यवधी रुपयांचे महसूल नुकसान झाले,” असे त्यांचे म्हणणे आहे.
डॉ. नागार्जुन गौडा सध्या खंडवा जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. “मी सर्व कागदपत्रे, पुरावे आणि वकिलांच्या सादरीकरणाच्या आधारे आदेश दिला. यात कोणतीही अनियमितता झालेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोण आहेत IAS डॉ. नागार्जुन गौडा?
डॉ. नागार्जुन बी. गौडा हे कर्नाटकमधील रहिवासी असून 2019 बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षण सोडून 2018 च्या युपीएससीमध्ये त्यांनी 418 वा अखिल भारतीय क्रमांक पटकावला होता. त्यानंतर मसूरी येथील LBSNAA मध्ये प्रशिक्षण घेत असताना ते सहकारी IAS अधिकारी सृष्टी जयंत देशमुख यांच्याशी विवाह केला.
या संपूर्ण प्रकरणातील दस्तावेज व निर्णय प्रक्रियेमुळे प्रशासनात पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. RTI कार्यकर्त्यांकडून चौकशीची मागणी होत असून, आता पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


