Rupali Chakankar: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुण्यामधील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. अजित पवार राज्याचे अर्थमंत्री आहेत. ते दहावी पास असून त्यांना काहीच कळत नाही, असे त्यांनी म्हटले. अजित पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दमानियांचे नाव न घेता चोख प्रत्युत्तर दिले आहे.
‘एक्स’वर पोस्ट करत चाकणकर म्हणाल्या की, ‘आदरणीय अजितदादा पवार यांच्या वडिलांचे हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्या वेळी अजितदादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते.वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडले.त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे.’
‘शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर दादांनी शेती करायला सुरूवात केली, पोल्ट्री व्यवसाय वाढवला, वेगवेगळी पिके घेतली. मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला.गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत.’, असे देखील त्यांनी सांगितले.
‘त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टीकोनामुळेच.’, असे देखील चाकणकर म्हणत होते.
दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
अजित पवारांना काहीच कळत नाही. महाराष्ट्र कर्जात बुजाला आहे. राज्यावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज आहे. अर्थमंत्री दहावी पास असून त्यांना काहीच कळत नाही. असेट काय आहेत लायबिलिटीज काय आहेत, एवढे नऊ लाख कोटी आपण आणार कुठे आहोत?, असे अंजली दमानिया यांनी म्हटले होते.


