Solapur News: सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. सोलापूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत संभाजी शिवाजी दोलतोडे या पोलीस कर्मचाऱ्याचा घरातील बेडवरून पडल्याने मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, दोलतोडे रविवारी रात्री आपल्या घरात गाढ झोपले होते. पहाटे गाढ झोपेत कूस बदलण्याचा प्रयत्न करत असताना ते अचानक बेडवरून खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या धक्कादायक घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेनंतर त्यांच्या पत्नीने तातडीने दोलतोडे यांना सोलापूरमधील खासगी रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संभाजी दोलतोडे हे माढा तालुक्यातील उपळाई खुर्द गावचे मूळ रहिवासी होते आणि सोलापूरात आपल्या कुटुंबासह राहत होते. ते गोळा फेक आणि थाळी फेक या खेळात अग्रेसर होते, तसेच त्यांच्या कार्यक्षमतेमुळे सहकाऱ्यांमध्ये त्यांचा सन्मान होता.
हेही वाचा – Pune Accidents: पुणे शहरात वेगवेगळ्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू
या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांसह सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. संभाजी दोलतोडे यांचा परिवारात पत्नी, दीड वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासन या घटनेचा तपास करत आहेत. दौलतोडे यांच्या अचानक मृत्यूनंतर सोलापूर शहरातील पोलीस दलामध्ये शोककळा पसरली आहे.


