पुणे: राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने विश्रांती घेतली आहे तर काही ठिकाणी पावसाचा कहर सुरू आहे. पाऊस थांबलेल्या भागात नागरिकांना उन्हाची झळ बसत आहे. त्यामुळे राज्यात थंडी नेमकी कधी सुरू होईल? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. हवामान विभागाने थंडीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. नोव्हेंबर मध्यनंतर थंडी सुरू होईल, अशी शक्यता हवामान विभागाने सुरु केली आहे.
हवामान तज्ज्ञांनी राज्यात थंडीच्या आगमनावर भाष्य केलं आहे. राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३९ टक्के जास्त पाऊस पडला. सध्या तेथे तापमानही सरासरीपेक्षा जास्त आहे. सकाळी कमी तापमान आणि दुपारपासून उन्हाच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे नागरिक घमाच्या धारांनी हैराण झाले आहेत.
वातावरणातील बदलांवर बोलताना हवामान विभागाने, ‘राज्यातील अनेक भागात 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. १७ ऑक्टोबर रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट आहे. या काळात मेघ गर्जनेसह पाऊस होईल असं सांगण्यात आलं आहे. मान्सून राज्यातून बहुतांश भागातून गेला असला तरी हा पाऊस मान्सूनचा नाही.
थंडी कधी सुरु होणार?
‘राज्यात डिसेंबर, जानेवारीमध्ये थंडी जानवेल. नोव्हेंबरमध्ये तापमान कमी होताना दिसेल. सरासरीपेक्षा कमी तापमान आता दिसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यानंतर थंडी सुरू होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


