मुंबई: लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडायच्या अजून बाकी आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठं यश आलं. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी संपूर्ण राज्यात फिरुन प्रचार केला होता. त्यामुळे निवडणूक ही अत्यंत अटीतटीची आहे, असं दृश्य होतं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही शरद पवार यांनी शड्डू ठोकला आहे. त्यांनी या निवडणुकांसाठी रणनीती देखील आखली आहे. या रणनीतीमुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण नक्कीच मिळणार आहे. कारण शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पत्ते उघडले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये ते तरुणांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मोलाच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार, अशी मोठी घोषणा केली आहे.
शरद पवार यांनी या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचा देखील निषेध यावेळी नोंदवला. राज्य पातळीवर किंवा स्थानिक पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका, प्रेमाची भाषा वापरा, आपल्या वक्तव्याने जातीय सलोखा बिघडणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना शरद पवार यांनी आजच्या बैठकीत आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.


