Dhule Road Accident: धुळे जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला असून, एका भीषण रस्ते अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणारी क्रूझर गाडी उलटल्याने हा थरार घडला. या घटनेत १५ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नियंत्रण सुटले अन् गाडीने खाल्ल्या पलट्या
मिळालेल्या माहितीनुसार, हे वऱ्हाड महिर गावाकडून लग्नासाठी निघाले होते. दुपारी तामसवाडी गावाजवळ क्रूझर आली असता, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. वेग अधिक असल्याने गाडीने महामार्गावरच दोन ते तीन वेळा पलट्या खाल्ल्या. हा अपघात इतका भयानक होता की, गाडीतील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या घटनेने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
महिला आणि बालकांसह १५ जण जखमी
या अपघातात जखमी झालेल्या १५ जणांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
आनंदाच्या क्षणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर
लग्नाच्या घरातील लगबग आणि उत्साहाचे वातावरण या एका अपघातामुळे पूर्णपणे विरून गेले आहे. ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, तिथे आता आक्रोशाचा आवाज ऐकू येत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून, ओव्हरलोडिंग किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला का, याची चौकशी केली जात आहे.


