धारावी: कुर्त्यात बेस्टच्या ज्या ओलेक्ट्रा कंत्राटी ई-बसचा भीषण अपघात झाला, त्याच कंपनीच्या भरधाव वेगाने जात असलेल्या बसने धारावीत एका तरुणाला धडक दिली. १७ डिसेंबरच्या सकाळी घडलेल्या अपघातात तिमेश येलप्पा पुजारी हा ३२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडून पाच दिवस उलटले तरी मुलाच्या उपचारांसाठी आर्थिक मदत मिळालेली नाही, तर धारावी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हासुद्धा दाखल केला नसल्याचा आरोप जखमी तिमेशची आई अनंतम्मा यांनी केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्टच्या बस मार्ग क्रमांक १६४ वरून धावणाऱ्या माझगाव ते धारावी आगार या ओलेक्ट्रा कंत्राटी ई-बसने १७ डिसेंबरच्या सकाळी साडेआठच्या सुमारास धारावीतील राजीव गांधी स्पोर्ट्स क्लब, ओएनजीसी सिग्नलजवळ रस्ता ओलांडत असलेल्या तिमेशला जोराची धडक दिली. अपघातात गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडलेल्या तिमेशला उपचारांसाठी येथील लाईफ केअर नावाच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिमेश हा तीन दिवस व्हेंटिलेटरवर होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पण आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असून मुलावर उपचार करणे शक्य नसल्याचे तिमेशची आई अनंतम्मा यांनी सांगितले. दरम्यान, मुलाच्या अपघातास कारणीभूत असलेल्या बेस्ट प्रशासन किंवा बस कंपनी यांनी अद्याप काहीच मदत केली नसून पोलीस फक्त माहिती घेऊन गेले, पण गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप आई अनंतम्मा यांनी केला आहे.


