भोकरदन (जालना) : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस पडला. तर, रविवारी वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी दुपारीही पिंपळगाव रेणुकाई परिसरात वीज कोसळल्याने पुन्हा दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश प्रकाश जाधव (३५) व सचिन विलास बावस्कर (२८) अशी मृतांची नावे आहेत, तर, प्रशांत सोनवणे हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिल्लोड येथे उपचार सुरू आहेत.
अवकाळी पावसाने रविवारी भोकरदन तालुक्याला झोडपल्यानंतर सोमवारीसुद्धा पावसाने हजेरी लावली. कोठाकोळी येथील गणेश जाधव व सचिन बावस्कर हे कामानिमित्त पिंपळगाव रेणुकाई शिवारात शेतात आले होते. अचानक विजेच्या कडकडाटात पाऊस सुरू होऊन वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. हे तिघेही कोठाकोळी येथील आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत गणेश हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तर, सचिन अविवाहित होता.


