Baba Siddique Murder Case: महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, मुंबई पोलिसांनी आता या प्रकरणी प्रशासकीय पातळीवर मोठी कारवाई केली आहे. सिद्दीकी यांचे अंगरक्षक असलेले पोलीस शिपाई श्याम सोनवणे यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी वांद्रे येथे झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांची तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती, ज्यावेळी सोनवणे तिथे तैनात होते.
कारवाईचे नेमके कारण काय?
श्याम सोनवणे हे मुंबई पोलिसांच्या ‘संरक्षण आणि सुरक्षा शाखे’मध्ये कार्यरत होते. हत्येच्या घटनेनंतर त्यांच्यावर कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर सुरू झालेल्या विभागीय चौकशीत ते दोषी आढळले. विभागाने त्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावून स्पष्टीकरण मागितले होते, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर त्यांना बडतर्फीचे पत्र देण्यात आले. 2 मे रोजी त्यांनी या पत्राची पोच दिली असून, आता ते अधिकृतपणे पोलीस दलातून बाहेर पडले आहेत.
२७ आरोपींवर ‘मोका’ आणि ‘बीएनएस’ अंतर्गत गुन्हे दाखल
या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना मुंबईतील विशेष न्यायालयाने अलीकडेच 27 आरोपींवर ‘मोका’ (MCOCA) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत. यामध्ये हत्येचा कट रचणे, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आरोप निश्चितीची ही प्रक्रिया फौजदारी खटल्यातील महत्त्वाची पायरी मानली जाते, ज्यामुळे आता या प्रकरणाचा कायदेशीर खटला अधिक वेगाने पुढे सरकणार आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कट उघड
मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे नाव समोर आले आहे. गुन्हेगारी विश्वात स्वतःचे वर्चस्व आणि दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अनमोल बिश्नोईने ही हत्या घडवून आणल्याचा दावा सरकारी पक्षाने न्यायालयात केला आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या धाग्यादोऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.


