मुंबई: महाराष्ट्रातील बदलापूर एन्काऊंटरबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या कोठडीतील मृत्यूसाठी न्यायालयाने पाच पोलिसांना जबाबदार धरले आहे. या पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. या पाच पोलिसांच्या विरोधात कोणती तपास यंत्रणा तपास करेल, हे सरकारला दोन आठवड्यात स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने सांगितले की, व्हॅनमध्ये उपस्थित असलेले पाच पोलिस आरोपींच्या एन्काऊंटरला जबाबदार असल्याचे न्यायदंडाधिकारी तपासातून समोर आले आहे. 12 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूरमध्ये दोन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली होती. त्यात अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी होता. 23 सप्टेंबर रोजी पोलीस चकमकीत शिंदे मारला गेला होता.
या चकमकीची दंडाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. त्याचा अहवाल तब्बल पाच महिन्यांनी आज (दि. 20) मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. आरोपी अक्षय शिंदे हा शाळेत सफाई कामगार म्हणून काम करायचा. 17 ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आपल्या मुलाला पोलिसांनी बनावट चकमकीत मारले, असा आरोप अण्णा शिंदे यांनी आपल्या याचिकेत केला आहे. बदलापूर येथील शाळेच्या शौचालयात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अक्षयला अटक करण्यात आली होती. तो शाळेत सफाई कामगार होता.
सप्टेंबरमध्ये तळोजा कारागृहातून चौकशीसाठी नेत असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शिंदे यांचा मृत्यू झाला होता. त्याने पोलिस व्हॅनमध्ये उपस्थित असलेल्या पोलिसाची बंदूक हिसकावून घेतली, गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले होते.


