मुंबई : वडाळा येथील आरसीएफ परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी पुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे. यामुळे सोमवारी सकाळपासून मुंबई, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईतील रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, कॅब आणि खासगी वाहनांची वाहतूक ठप्प होण्याची दाट शक्यता आहे.
काल दुपारपासून पेट्रोल पंपांवर सीएनजी पोहोचले नसल्याने परिसरातील बहुतांश सीएनजी स्टेशनवरील इंधन संपले आहे. परिणामी, पंपाबाहेर वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून, सकाळपासून रस्त्यावर रिक्षा-टॅक्सींची संख्या लक्षणीय कमी झाली आहे. याचा थेट फटका कामावर जाणाऱ्या नागरिकांना आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना बसत असून, अनेकांना रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे.
महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) च्या सिटी गेट स्टेशनला जाणारा गॅस पुरवठा कमी झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील जवळपास १३३ सीएनजी पंपांवर परिणाम झाला आहे. सध्या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमधील सीएनजीही संपत आला असून, दुपारपर्यंत बिघाड दुरुस्त न झाल्यास रिक्षा, टॅक्सी, बेस्टच्या काही बसेस आणि खासगी सीएनजी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद पडू शकते.
कंपनीकडून बिघाड दुरुस्तीला किती वेळ लागेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, घरगुती ग्राहकांसाठी पीएनजी पुरवठा सुरळीत ठेवला जाईल, अशी खात्री एमजीएलने दिली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजीवर अवलंबून असलेली वाहतूक व्यवस्था या टंचाईमुळे मोठ्या संकटात सापडली आहे.


