मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेली कडाक्याची थंडी सध्या काहीशी ओसरली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाळी स्थितीमुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली असून अनेक भागांत उकाडा जाणवू लागला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज किमान तापमानात वाढ कायम राहणार असून, उद्यापासून मात्र तापमानात पुन्हा हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, काल धुळे येथे ७ अंश सेल्सिअस, तर निफाड येथे ७.७ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवण्यात आले. जळगाव, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही तापमान ११ अंश किंवा त्यापेक्षा कमी होते. मात्र उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा वाढल्याचे चित्र आहे.
आज कुठे पावसाची शक्यता?
आज राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान राहणार असून हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ढगाळ वातावरणामुळे गारठा कमी होऊन उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
उद्या पुन्हा थंडी वाढणार?
उद्यापासून किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज असून, काही भागांत पुन्हा थंडी वाढू शकते. हवामान तज्ज्ञांच्या मते, किमान तापमान १० अंशांखाली गेले आणि सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी घट झाली, तर थंडीची लाट समजली जाते. तापमानात ६.५ अंशांपेक्षा जास्त घट झाल्यास तीव्र थंडीची लाट मानली जाते.
नागरिक व शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा
सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, शेतकऱ्यांच्या पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हवामान अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


