मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनला निरोप देण्याची वेळ आली असली तरी हवामानात मोठे बदल घडत आहेत. राज्यातील काही भागांतून मान्सून परतीला सुरुवात झाली असून, हवामान विभागाने (IMD) पुढील ३-४ दिवसांत पूर्ण माघार घेण्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील नव्या हवामान प्रणालींमुळे अवकाळी पावसाचे संकट उद्भवण्याची शक्यता आहे.
१० ते १२ ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यातून निघून जाईल, पण त्यानंतर ऑक्टोबर हिटच्या झळा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. IMD च्या अहवालानुसार, शक्ति चक्रीवादळ नाहिस झाल्याने परतीला गती मिळाली असली तरी बंगालच्या उपसागरातील सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे पावसाचा धोका कायम आहे.
महाराष्ट्रातून मान्सून परतीला सुरुवात
राज्यातील विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातून मान्सून परतीला सुरुवात झाली आहे. IMD नुसार, अरबी समुद्रात शक्ति चक्रीवादळ नाहिस झाल्याने परतीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पुढील २४ तासांत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून, बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या दिशेने सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाले आहे.
हवामानतज्ज्ञ तृष्णू यांच्या मते, १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान मान्सून पूर्णपणे माघार घेईल, ज्यामुळे राज्यातील ओलावा कमी होईल आणि हवामान कोरडे पडेल. मात्र, IMD च्या लाँग रेंज फोरकास्टनुसार, ऑक्टोबर महिन्यात सामान्य ते वरील पावसाची शक्यता असल्याने पूर्ण कोरडे हवामान येणार नाही.
पुढील चार दिवसांचे हवामान
- पूर्वानुमान ८ ते १० ऑक्टोबरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता
- ८ आणि ९ ऑक्टोबर: विदर्भ वगळता राज्यातील बहुतेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.
- मध्य महाराष्ट्र आणि कोकणात: काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता.
- १० ऑक्टोबर: कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम.
- ११ ते १२ ऑक्टोबर या दोन दिवसांत हवामान ढगाळ राहील, मात्र पाऊस जवळपास थांबेल.तापमान वाढेल, ऑक्टोबर हिटचा कडाका जाणवेल, आणि उष्णतेमुळे घामाच्या धारा वाहतील.
अवकाळी पावसाचे संकट
पश्चिम आणि दक्षिणेकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. परतीच्या पावसामुळे आधीच ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून, आता अतिवृष्टी झाल्यास शेती आणि पायाभूत सुविधांना धोका निर्माण होऊ शकतो. हवामानतज्ज्ञांच्या मते, ला नीना प्रभाव डिसेंबरपर्यंत जाणवू शकतो, ज्यामुळे नंतर कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. IMD च्या लाँग रेंज फोरकास्टनुसार, ऑक्टोबरमध्ये सामान्य ते वरील पावसामुळे हिटवेव्हचा धोका कमी असला तरी स्थानिक पावसाच्या घटनांना सतर्क राहण्याची गरज आहे.


