मुंबई : मतदारयादीतील घोळ, कथित मतचोरी आणि निवडणूक आयोगाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे आज (१ नोव्हेंबर २०२५) मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढणार आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदारयादीत ९६ लाखांहून अधिक बोगस मतदारांचा समावेश असल्याचा आरोप करत हा संयुक्त एल्गार आहे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन सपकाळ यांसह प्रमुख नेते सहभागी होणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
मोर्चाची वेळ, मार्ग
– वेळ : दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत.
– मार्ग : दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीटवरून सुरुवात होऊन मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिका (बीएमसी) प्रवेशद्वारापर्यंत.
मुख्य मागण्या
– मतदारयादीतील डुप्लिकेट, बोगस आणि गायब मतदारांची तात्काळ तपासणी व दुरुस्ती.
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या पर्यंत स्थगित.
– ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांच्या माध्यमातून निवडणुका घेण्याची मागणी.
या मोर्चाला पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. विनापरवानगी मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले की, “पोलिसांसोबतची बैठक सकारात्मक झाली होती. परवानगी नसली तरीही मोर्चा होईल आणि कारवाई झाली तर सामोरे जाण्यास तयार आहोत.” ते पुढे म्हणाले, “राज ठाकरे ट्रेनने मुंबईत पोहोचणार असून, पावसातही मोर्चा तसाच चालेल.”
कोणा कोणाची भाषणं होणार?
शरद पवार (एनसीपी-एसपी)
उद्धव ठाकरे (शिवसेना-यूबीटी)
राज ठाकरे (मनसे)
बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस)
याशिवाय, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि इतर एमव्हीए नेतेही उपस्थित राहणार आहेत. हा मोर्चा लोकशाहीवरील हल्ल्याविरोधात असून, जनतेला सत्य समोर आणण्यासाठी असल्याचे आयोजक सांगत आहेत.


