Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे यांना महापालिका निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचे आदेश दिले आहेत. शिंदे यांनी शनिवारी (दि. 25) दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर राऊत यांनी हा हल्लाबोल केला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह यांच्यावर सुनावणीची तारीख जवळ येते, तेव्हा शिंदे यांचे पाय लटपटतात आणि ते दिल्लीला धाव घेतात. ते म्हणाले, “शिंदे यांना त्यांच्या मालकांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत जावे लागते. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे, त्याचे नेतृत्व आणि मुख्य कार्यालय राज्यातच असते, दिल्लीत नाही. पण शिंदे यांचे मालक दिल्लीत असल्याने त्यांना तिकडे जावे लागते.”
राऊत यांनी शिंदे गटाच्या पक्ष आणि चिन्ह यांच्यावरील दाव्यावरही टीका केली. ते म्हणाले, “सुप्रीम कोर्टात शिंदे यांचा बचाव कोणत्याही कायद्याच्या आधारे शक्य नाही. जर असा प्रयत्न झाला, तर भारतीय न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा आणि जगाचा विश्वास उडेल.” राऊत यांनी शिंदे यांच्यावर चोरलेला पक्ष चालवत असल्याचा आरोप करत, त्यांना शिवसेनेचा इतिहास माहीत नसल्याचा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.


