जामखेड: साकतचे सरपंच तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेड तालुका उपाध्यक्ष हनुमंत मुरूमकर-पाटील (वय 48) यांचे ब्रेन हॅमरेजने बुधवार 15 जानेवारी रोजी रात्री 8:45 वाजता निधन झाले आहे. यामुळे साकतसह जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे.
हनुमंत मुरूमकर-पाटील यांना 13 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता अचानक त्रास होऊ लागल्याने ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. वाटेत घाटाजवळ त्यांना जास्त त्रास झाल्याने जामखेडवरून अहमदनगर आणि पुढे पुणे येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
दरम्यान मंगळवारी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी स्वत: हॉस्पिटलमध्ये जात डॉक्टरांना भेटून मुरूमकर-पाटील यांच्यावर होणाऱ्या उपचाराची माहिती घेतली. तसेच मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात यावी, असे सांगितले होते. परंतु, रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करता आली नाही. बुधवारी रात्री 8.45 वाजता मुरूमकर-पाटील यांची प्राणज्योत मालवली. हनुमंत मुरूमकर-पाटील यांनी स्वकर्तृत्वावर राजकारण व समाजकारणात एक वेगळा ठसा उमटवला होता. 2010 ते 15 पर्यंत ते साकतचे सरपंच होते. तसेच सध्या त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांची भावजयी सरपंच आहेत. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.


