चाकण : पूर्ववैमनस्यातून दोघांनी एका तरुणाचा धारदार वस्तऱ्याने गळा चिरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकणलगतच्या मेदनकरवाडी, बालाजीनगर परिसरात रविवारी (दि.५) सकाळी पावणे सात वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. चाकण पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सचिन श्रीराम आरेकर (वय २६, रा. टेलिफोन कॉलनी अमृत नगर, मेदनकरवाडी, ता. खेड, मुळ रा. भानकवाडी, ता. कासार शिरूर, जि. बीड) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी सचिन आरेकर यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चाकण पोलिसांनी ऋतिक उर्फ सायको (रा. अमृत नगर कॉलनी, मेदनकरवाडी, ता. खेड) व अभिषेक सोनवणे (पूर्ण नाव, गाव व पत्ता निष्पन्न नाही.) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक व ऋतिक यांनी रविवारी सकाळी आरेकर याला जीवे ठार मारण्याचा कट रचला होता. यातील सोनवणे याने आरेकर याला फोनवरून संपर्क साधून ‘तुला भेटायचे आहे’ असे म्हणून प्रेमाचा चहा येथे बोलून घेतले. पडवळ बंधू दूध डेरी फार्मसमोर आरोपी सायको याने आरेकर याला पाठीमागून जोरदार मिठी मारली. आरोपी सोनवणे याने ‘आज याला सोडायचे नाही. याची विकेट टाकायची’ असे म्हणत आरेकर यांच्या गळ्यावर व डाव्या हाताच्या अंगठ्या शेजारील बोटावर वार करून गंभीर जखमी केले. आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत जोरजोरात आरडाओरड करत ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणून दहशत माजवली.


