PCMC Politics : राजकारणात ‘काहीही घडू शकते’ याची प्रचिती आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पाहायला मिळाली. उपमहापौर पदासाठी भाजपने नाव निश्चित केलेले निष्ठावंत नगरसेवक शीतल शिंदे यांनी ऐनवेळी पद स्वीकारण्यास नकार दिल्याने मोठी खळबळ उडाली. या नाट्यमय घडामोडीनंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वैशाली काळभोर यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरल्याने, महापालिकेत आता भाजप-राष्ट्रवादी ‘हातमिळवणी’ करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
भाजप निष्ठावंताची नाराजी आणि ‘एक्झिट’
सलग तीन वेळा निवडून आलेले भाजपचे शीतल शिंदे महापौर पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, पक्षाने महापौरपदी रवी लांडगे यांची वर्णी लावल्याने शिंदे प्रचंड नाराज झाले. त्यांना उपमहापौर पदाचा प्रस्ताव देण्यात आला, परंतु “मला हे पद नको” असे ठणकावून सांगत ते महापालिकेतून निघून गेले. पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.
संघर्ष संपला? नवी समीकरणे काय सांगतात?
पिंपरी-चिंचवडमध्ये नेहमीच भाजपचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शहरातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. अजित पवारांना आदरांजली म्हणून राष्ट्रवादीने महापौर पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे भाजपचा महापौर बिनविरोध निवडून आला. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या आदेशानुसार वैशाली काळभोर यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला. यामुळे दोन्ही पक्ष आता सत्तेत भागीदारी करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर शहरात मोठा संघर्ष टाळण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी दोन्ही पक्षांनी ‘युती’चा मार्ग निवडल्याचे बोलले जात आहे. मात्र, यामुळे भाजपमधील निष्ठावंतांच्या नाराजीचा फटका आगामी काळात पक्षाला बसू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.


