Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नागरिक उकाड्याने अक्षरशः हैराण झाले होते. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडल्याने सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत होता. मात्र आता नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने राज्यात आजपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांत ७ मेपर्यंत पावसाचा प्रभाव राहू शकतो. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः विदर्भात ४ ते ७ मेदरम्यान हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’च्या प्रभावामुळे मध्य भारतातील हवामान बदलत असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येणार आहे.
चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, मराठवाड्यात ५ ते ७ मेदरम्यान पावसाची शक्यता असून कोकणात सध्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
उष्णतेचा कहर अद्याप कायम असून नागपूरमध्ये ४१.८ अंश सेल्सियस तर चंद्रपूरमध्ये तब्बल ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. मात्र येत्या काही दिवसांत पावसामुळे तापमानात घट होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


