पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन २०४१ ची लोकसंख्या लक्षात घेऊन शहराचा नवीन विकास आराखडा (डीपी प्लॅन) तयार करण्यात आला आहे. तो येत्या काही दिवसात जाहीर केला जाणार आहे. त्यावर सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यावर सुनावणी होऊन आराखडा अंतिम केला जाईल, असे महापालिकेच्या अधिकऱ्यांनी सांगितले.
महापालिकेच्या सन १९९७मध्ये विकास आराखडा तयार करण्यात आला होता. त्याची मुदत १७ मे २०२५ ला संपत आहे. महापालिकेने सन २०४१ मधील शहराची लोकवस्ती आणि लोकसंख्या लक्षात घेऊन डीपी तयार केला आहे. आराखडा बनविण्याचे काम अहमदाबाद गुजरात येथील खासगी एजन्सीने केले आहे. पवना, इंद्रायणी व मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी डीपीआरही त्याच एजन्सीने केला आहे. डीपी आराखडा आता अंतिम टप्यात आला आहे.
आराखड्यासाठी सन २०१८ पासून काम सुरू हेते. मार्च २०२० मध्ये कोरोना महामारी सुरू झाल्याने कामास विलंब झाला. दोन वर्षांची मुदत वाढवून देण्यात आली, वाढीव मुदत मे महिन्यात संपत आहे. प्रारूप आराखडा जाहीर करून त्यावर नागरिकांकडून सूचना व हरकती स्वीकारल्या जातील. त्यासाठी
३० दिवसांची मुदत दिली जाते. सर्व हरकती व सुचनांवर सुनावणी घेऊन अंतिम आराखडा राज्य शासनाला सादर करण्यासाठी ४ महिन्यांची मुदत आहे. महापालिकेने १७ मे रोजीपूर्वी आराखडा प्रसिद्ध केला नाही, तर तो रद्द होईल. आराखड्यासंदर्भात असणारी मुदत संपण्याच्या आत महापालिका आराखडा जाहीर करण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने काम करण्यात येत आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विकास झालेल्या भागात आरक्षण नाही
ज्या ठिकाणी शहरात इमारत निर्माण झाल्या आहेत. तसेच, विकास झाला आहे. नवीन विकास आराखड्यात तेथे आरक्षणे टाकण्यात आलेली नाहीत, मोकळ्या जागांवर नवीन आरक्षण असणार आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा, इंद्रायणी या नद्यांच्या लगत हरित झोन असतो. त्यावर पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक उद्यान, क्रीडा केंद्र, ओपन जीम व मनोरंजन केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच, शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्यासाठी नवा मेट्रो मार्ग, बीआरटीचा बस मार्ग, लोकल मार्ग, रिंग रोड असा सूक्ष्मपणे आराखडा तयार करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


