पुणे: शहरातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तो ट्रक इतर वाहनांवर आदळला. त्यानंतर तो ट्रक दुसऱ्या छोट्या वाहनांना घेऊन मोठ्या ट्रकवर आदळला. त्यामुळे, घटनास्थळी कारमधील सीएनजीचा स्फोट होऊन आग लागल्याची भीषण दुर्घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अपघाताची दाहकता लक्षात येते.
पोलीस व अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य राबवण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला. तर, आमदार रोहित पवार यांनी शासनाने येथील पुलासंदर्भाने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
अजित पवारांकडून शोक व्यक्त
पुण्यातील अपघातावर उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला. ‘नवले पुलाजवळ दोन कंटेनरची झालेली धडक आणि त्यामध्ये एका कारचा झालेला भीषण अपघात तसेच त्यानंतर लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी असून मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो‘, असे म्हणत अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली.
रोहित पवारांचं ट्विट नवले पूल ब्लॅक स्पॉट
पुण्यातला नवले पूल हे ठिकाण ब्लॅक स्पॉट बनलं असून इथं आतापर्यंत झालेल्या विविध अपघातात अनेक जणांचे बळी गेले आहेत. आजही झालेल्या विचित्र अपघात 9 हून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवले पुलावर होणारी वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांची वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. इथं वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत. शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.


