बारामती : सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते बारामती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत आमच्याकडे कोणतीही चर्चा झालेली नाही. ही चर्चा मुंबईत झाली असावी. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. तो निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. त्यांच्या पक्षाने काय करायचं, हे त्यांनी ठरवावं.” तसेच या विषयावर आपण अधिक भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, या प्रक्रियेत अजित पवार, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे सक्रिय होते. गेल्या चार महिन्यांपासून सकारात्मक चर्चा सुरू होती आणि १२ तारखेला निर्णय जाहीर करण्याचे ठरले होते. मात्र, अपघातामुळे या प्रक्रियेला खंड पडला.
यावेळी शरद पवार भावूक झाले. त्यांनी अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून देत, “अजित पवार हा कर्तृत्ववान नेता होता. लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर काम करणे हे त्याचे वैशिष्ट्य होते. अशा व्यक्तीचं जाणं ही सर्वांसाठी मोठी हानी आहे,” असे सांगत नव्या पिढीवर अधिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.


