NCP politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत असताना सुनेत्रा पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेत पक्षाची जबाबदारी तिहेरी पातळीवर वाटून दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सर्व सूत्रं आपल्या हाती घेतलेल्या सुनेत्रा पवार आता संघटना अधिक मजबूत करण्याच्या तयारीत दिसत आहेत.
या नव्या निर्णयानुसार, सुनेत्रा पवार स्वतः राज्यभर दौरे करत पक्ष संघटनेवर लक्ष ठेवणार आहेत. तर पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईतील राजकीय समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीण भागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात काही अंतर्गत हालचाली वाढल्याची चर्चा होती. काही ज्येष्ठ नेत्यांकडून नेतृत्वावर दावा केला जाऊ शकतो, अशा पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी पक्षाची सूत्रं कुटुंबातच ठेवण्याचा हा निर्णय असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही आता सक्रिय राजकारणात अधिक पुढे येताना दिसत आहेत. बारामती पोटनिवडणुकीदरम्यान जय पवार यांनी 2029 विधानसभा निवडणुकीबाबत संकेत दिले होते. त्यावर रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया देत “पुन्हा पवार विरुद्ध पवार” अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली.
या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळात राजकीय समीकरणं अधिकच रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


