पुण्यात बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने एक विशेष जनजागृती उपक्रम राबवला. या अंतर्गत, पर्वती येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलमध्ये पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यातून शालेय विद्यार्थ्यांना बाल गुन्हेगारीचे गंभीर परिणाम सांगितले गेले.
या पथनाट्यातून दोन मुलांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला. एका मुलाचे कुटुंब कष्टकरी आणि शिक्षणाला प्राधान्य देणारे होते, तर दुसऱ्या मुलाचे कुटुंब दारूच्या व्यसनाने त्रस्त होते. दारू पिणाऱ्या वडिलांमुळे बिघडलेले घरगुती वातावरण आणि पैशासाठी दुकानात अपमान सहन केल्यानंतर गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलाची मानसिक घुसमट यात प्रभावीपणे मांडण्यात आली.
पथनाट्याच्या शेवटी, एका सुजाण मित्राने केलेल्या योग्य प्रबोधनामुळे तो मुलगा चुकीच्या मार्गावरून परत येतो आणि शिक्षण-संस्कारांच्या दिशेने वाटचाल सुरू करतो, असा सकारात्मक संदेश देण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, शाळेचे मुख्याध्यापक अजित माने आणि संजय भैलुमे उपस्थित होते. किशोर साव व विशाल भैलुमे यांनी या पथनाट्याचे दिग्दर्शन केले.
यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाड म्हणाल्या की, लहान वयात मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीचे आकर्षण वाटू शकते. यासाठी काही वेळा पालक आणि नेते मंडळी जबाबदार असतात. केवळ मुलांनाच नव्हे, तर पालकांनाही याबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये संयम आणि ताकद निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले की, मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे बाल गुन्हेगारांची संख्या वाढली आहे. ही संख्या कमी करण्यासाठी शासन, पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था चांगले काम करत आहेत. मात्र, पालकांनी लहान वयात मुलांना मोबाईल देणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. उदय जगताप यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले की, पुण्यातील गणेशोत्सव मंडळे बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी सक्रिय आहेत. परमेश्वराची खरी सेवा मंदिरात नसून समाजातील गरजूंची सेवा करण्यात आहे. परमेश्वराची मंदिरे केवळ देवदेवतांच्या मूर्तींची न राहता समाजसेवेची महामंदिरे व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप यांनी माहिती दिली की, त्यांचे मंडळ गुन्हेगारी कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवते. पुण्यातील गुन्हेगारी वाढू नये यासाठी मंडळाने शहरातील २० शाळांमध्ये ‘प्रकाशवाटा गुन्हेगारी मुक्तीच्या’ हा उपक्रम सुरू केला आहे. याशिवाय, पुणे शहरात ‘संवाद परिवर्तन यात्रा’ देखील काढण्यात येणार आहे. शहरातील गणेश मंडळे या उपक्रमात मदत करत आहेत. शाळा, समाज आणि पोलीस एकत्र आल्यास शहरातील गुन्हेगारी निश्चितपणे कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


