कोल्हापूर : नांदणी जैन मठातील माधुरी हत्तीण गुजरातमधील वनतारा केंद्रातून परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समिती समोर मुंबईत झालेल्या सुनावणीत माधुरीच्या आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल सादर करण्यात आला. तसेच मठाच्या जागेवर वनतारा संवर्धन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक सर्व पूर्वपरवानग्या मिळाल्या आहेत. ही सुनावणी अतिशय सकारात्मक पार पडली असून, सर्व पक्षकारांनी समाधान व्यक्त केले आहे.
नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मनोहरण यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीने माधुरीच्या एकूण आरोग्याबाबत सकारात्मक अहवाल दिला. यात माधुरी आणि तिच्या महूत यांच्यातील विशेष नातेसंबंधाला अधोरेखित करण्यात आले. सुनावणीत पुनर्वसन केंद्राच्या बांधकामासाठी ७ टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून, १२ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाचे बजेट सादर करण्यात आले आहे.
न्यायमूर्ती वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत नांदणी मठ, वनतारा आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त प्रस्तावाला मान्यता मिळाली. बांधकामासाठी पूर्वपरवानग्या देण्यात आल्या असून, यापुढे कामाला गतिमानता येईल. मठाच्या जागेवर हे संवर्धन केंद्र उभारले जाणार असल्याने माधुरीला परिचित वातावरणात राहता येईल.
माधुरीच्या बाबतीत पूर्ण वस्तुस्थिती मांडण्यात आली असून, पुढील प्रक्रियेला वेग आला आहे. सुनावणीनंतर सर्व पक्षकारांनी समाधान व्यक्त केले. यापूर्वी माधुरीला वनतारामध्ये हलवण्यात आले होते, मात्र स्थानिकांच्या भावना आणि आंदोलनानंतर हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
नांदणी मठ आणि परिसरातील भक्तांसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे. माधुरी लवकरच मठात परत येऊन भक्तांना आशीर्वाद देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


