सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत हिंसाचाराची सनसनाटी घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक २ मधून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून भाजपच्या अधिकृत आणि बंडखोर गटात झालेल्या वादात मध्यस्थी करायला गेलेले मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरवदे यांचा उपचारादरम्यान सहकारी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी जेल रोड पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
प्रभाग २ मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे यांच्या विरोधात बंडखोर रेखा सरवदे यांनी अर्ज दाखल केला होता. रेखा यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी दोन्ही गटात तीव्र वाद झाला. यात शंकर शिंदे यांचे कार्यालय फोडण्यात आले. वाद मिटवण्यासाठी मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे मध्यस्थीला गेले होते. मात्र, शिंदे गटाच्या लोकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी आणि मनसे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केला आहे.
इंगळे म्हणाले, “समाजात वाद नको म्हणून सरवदे मध्यस्थीला गेले होते. भाजप नेते आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख यांचे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी सरवदे कुटुंबावर दबाव होता. शिंदे गटाने सरवदेंचा खून केला.”
या घटनेमुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मनसेने या खुनाचा तीव्र निषेध केला असून, कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराच्या या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. १५ जानेवारीला मतदान असून, या प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


