महाराष्ट्र जागरण डेस्क: मंगळवारी सकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, इस्रायल आणि इराणमधील युद्धातील दोन्ही बाजूंनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कतारमधील अमेरिकेच्या अल उदीद हवाई तळावर इराणने हल्ला केल्यानंतर काही तासांतच ही घोषणा करण्यात आली. इराणचा हा हल्ला प्रतीकात्मक असला तरी, याद्वारे इराणने अमेरिकेला स्पष्ट केले की, ते ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या धमक्यांना घाबरणार नाहीत.
इस्रायलच्या अस्तित्वानंतरचे हे पहिलेच युद्ध होते, ज्यामध्ये इस्रायली शहरांवर इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यात आला. ८६ वर्षांचे वय असलेले सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी त्यांच्या हत्येच्या धमकीनंतरही इराणच्या जनतेचा सन्मान आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी शरणागती पत्करण्यास नकार दिला. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, इराणचे लोक शेवटच्या श्वासापर्यंत पॅलेस्टाईनसाठी लढत राहतील. त्यानंतर जगभरातील मुस्लिमांमध्ये इराणचा आदर वाढला आहे.
सौदी अरेबिया आणि तुर्कीसारखे देश मुस्लिम जगताचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करतात, परंतु हे दोन्ही देश इस्रायलविरुद्ध कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. अमेरिका आणि इस्रायलला इराणने जशास तसे उत्तर दिल्यानंतर, शिया मुस्लिमांसोबतच सुन्नी मुस्लिमांमध्येही खामेनी यांचे स्थान वाढले आहे.
इस्लामिक देशांच्या पाठिंब्याशिवाय खामेनींनी आव्हान स्वीकारले
सौदी अरेबिया आणि कतार सारख्या आखाती देशांनी गेल्या २१ महिन्यांपासून गाजा येथे सुरू असलेल्या इस्रायली हत्याकांडाचा फक्त निषेध केला आहे. परंतु, इराण सुरुवातीपासूनच पॅलेस्टाईनशी असलेल्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम राहिल्याने इस्रायलला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
इराण हा शिया देश आहे आणि पॅलेस्टाईन हा सुन्नी देश आहे, पण जेव्हा गाझावर हल्ला झाला. तेव्हा इराण प्रथम इस्रायलच्या विरोधात उभा राहिला. युद्धाच्या सुरुवातीपासूनच, हुथी आणि हिजबुल्लाह सारख्या इराणच्या प्रॉक्सी संघटनांनी इस्रायलला त्रास दिला आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की, इराण हमासला लष्करी आणि आर्थिक मदत देखील करतो.
इराणने आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅलेस्टाईनचा मुद्दा राजनैतिक पातळीवरही उपस्थित केला. गाझा युद्धाला दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच, इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या नजरेत आपली विश्वासार्हता गमावण्यास सुरुवात केली. त्यानंतर इस्रायलने इराणमधील आपल्या गुप्तहेर नेटवर्कद्वारे प्रमुख इराणी नेते आणि अधिकाऱ्यांची हत्या करण्यास सुरुवात केली. तरीही, इराण पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यापासून मागे हटला नाही.
इराण थेट युद्धात उतरला
गेल्या दोन वेळा, इस्रायल आणि इराणमध्ये काही किरकोळ संघर्ष दूरवरून दिसून आले होते, परंतु १३ जून रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि त्यांच्या अनेक लष्करी आणि अणु केंद्रांना लक्ष्य केले. तसेच सुमारे ३० अधिकारी आणि शास्त्रज्ञांना ठार मारले.
इस्रायलच्या या हल्ल्यानंतर दोघांमधील संघर्ष वाढला आणि इराण आणि इस्रायलमध्ये १० दिवस सतत हवाई हल्ले झाले, ज्यामध्ये इराणमधील सुमारे ६०० लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर इस्रायलमध्येही सुमारे ३० लोक मारले गेले.
खामेनी अमेरिकेलाही घाबरत नाही
सुमारे एक आठवडा इशारे दिल्यानंतर, शनिवारी रात्री, २१ जून रोजी, ट्रम्प यांनी त्यांच्या सर्वात धोकादायक बी-२ बॉम्बरने इराणच्या तीन अणुस्थळांवर नतान्झ, फोर्डो आणि इस्फहानवर हल्ला केला. यासोबतच ट्रम्प यांनीअशी धमकीही दिली की, आम्हाला माहित आहे की खामेनी कुठे आहेत आणि इराणने आत्मसमर्पण करावे.
खामेनी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपला उत्तराधिकारी निवडताना आपल्या देशवासियांना आवाहन केले की, माझ्या जीवाचे काही मूल्य नाही, माझ्यानंतर तुम्हाला इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या बाजूने उभे राहावे लागेल. त्यांनी अमेरिकन हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची शपथही घेतली. मंगळवारी पहाटे इराणने जे सांगितले होते, तेच केले. कतारमधील अमेरिकन हवाई तळावर सुमारे १० क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आणि म्हटले की आम्ही अमेरिकन तळांनाही लक्ष्य करण्यास सक्षम आहोत.
इराणने शरणागती न पत्करता अमेरिका आणि इस्रायललाही युद्धबंदी करण्यास भाग पाडले आहे. त्यानंतर खामेनी जगभरातील मुस्लिमांचे हिरो बनले आहेत.


