PCMC Voter List: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात झालेल्या चुका, गोंधळ आणि त्रुटींमुळे नागरिकांसह राजकीय पक्षांनी मोठा आक्रोश व्यक्त केला आहे. फक्त १४ दिवसांत तब्बल 10,288 हरकती निवडणूक विभागाकडे दाखल झाल्या असून, यंदाची संख्या विक्रमी ठरली आहे. अखेरीस केवळ एका दिवसात 3,216 हरकती दाखल झाल्याने मतदार यादीतील त्रुटींचे गांभीर्य स्पष्ट झाले आहे. तथापी क क्षेत्रीय कार्यालयात 2,461 हरकती दाखल होत सर्वाधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या.
मतदार यादीत गोंधळाची मालिका
सर्वांधिक 2 हजार 461 तक्रारी क क्षेत्रीय कार्यालयात जाधववाडी प्रभाग क्रमांक 2, धावडेवस्ती प्रभाग क्रमांक 6, इंद्रायणीनगर, गवळीमाथा प्रभाग क्रमांक 8 आणि नेहरुनगर, खराळवाडी, मासुळकर कॉलनी प्रभाग क्रमांक 9 या चार प्रभागांबाबत आहेत. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदार संघाची मतदार यादी फोडून 1 ते 32 प्रभागांची प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. त्या यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि चुका आहेत. एका प्रभागातील मतदारांची नावे तसेच, यादी भाग दुसर्या प्रभागात जोडण्यात आल्या आहेत. काही माजी नगरसेवक तसेच, निवडणूक लढणार्या उमेदवारांची नावे गायब झाली आहेत. महापालिका कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे मतदार यादीचा घोळ होऊन गोंधळ उडाला आहे. संतापलेल्या राजकीय पक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक व नागरिकांकडून तक्रारी, हरकती, आक्षेप व सूचना मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आल्या.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार यादीतील गोंधळ वाढला; 8 हजारांहून अधिक तक्रारी दाखल
सर्वांधिक 3 हजार 216 हरकती दाखल
आज अखेरच्या दिवशी सर्व आठ क्षेत्रीय कार्यालय आणि मतदार यादी कक्षाकडे सर्वांधिक 3 हजार 216 हरकती दाखल करण्यात आल्या. वीस नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या 14 दिवसांच्या मुदतीमध्ये विक्रमी 10 हजार 288 हरकती प्राप्त झाल्या आहेत. क क्षेत्रीय कार्यालयाकडे सर्वांधिक 2 हजार 461 हरकती दाखल झाल्या आहेत. फेबु्रवारी 2017 ला झालेल्या निवडणुकीत मतदार यादीवर महापालिकेस 772 हकरती प्राप्त झाल्या होत्या. तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या सन 2022 मधील निवडणुकीसाठी 8 हजार 620 हरकती दाखल झाल्या होत्या. मात्र, ती निवडणूक रद्ध झाली होती. मागील आकडेवारी लक्षात घेता यंदाच्या हरकती या विक्रमी संख्येने आहेत.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये तीन लाख 63 हजार मतदारांचा घर क्रमांक गायब! दुबार, मयत मतदारांची नावे कायम
विभागनिहाय हरकतींची संख्या – (क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्रमांक – दाखल हरकती)
- अ: 10, 14, 15, 19 – 818
- ब: 16, 17, 18, 22 – 1,308
- क: 2, 6, 8, 9 – 2,461 (सर्वाधिक)
- ड: 25, 26, 28, 29 – 1,480
- ई: 3, 4, 5, 7 – 430
- फ: 1, 11, 12, 13 – 1,668
- ग: 21, 23, 24, 27 – 1,345
- ह: 20, 30, 31, 32 – 780
एकूण: 10,288 हरकती
इतिहासात प्रथमच इतक्या तक्रारी
2017 निवडणूक: 772 हरकती
2022 (रद्द झालेली) निवडणूक: 8,620 हरकती
2024-25: 10,288 हरकती – सर्वकालीन उच्चांक
यावरून यंदाची मतदार यादीमध्ये झालेला गोंधळ किती मोठा आहे, हे स्पष्ट होते. हरकती, तक्रार, आक्षेप व सूचनांवर गुरूवार (दि.4) पासून सुनावणी घेण्यात येणार आहे. अ अर्ज भरणारे 2 हजार 705 आणि ब अर्ज भरणारे 236 तक्रारदारांना सुनावणीला बोलविण्यात येणार आहे. गठ्ठयाने हरकती दाखल केलेल्यांच्या तक्रारी महापालिकेने सुमोटो दाखल करून घेतल्या आहेत. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून अंतिम मतदार यादी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे हे पुढील बुधवारी (दि.10) प्रसिद्ध करणार आहेत. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना महापालिका निवडणुकीत मतदान करता येणार आहे. मतदार यादीच्या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष निवडणुकीस सुरूवात होणार आहे.


