Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर केली असली, तरी या याद्यांतील मोठ्या चुका आता चिंतेचा विषय ठरत आहेत. एकूण 17,13,891 मतदारांपैकी तब्बल 3,63,939 मतदारांचे घर क्रमांक पूर्णपणे गायब आहेत. मतदार ओळख, पत्ता पडताळणी आणि मतदान केंद्र निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली ही मूलभूत माहितीच अनुपस्थित असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. याहूनही गंभीर म्हणजे, 92 हजारांहून अधिक नावे यादीत दुबार आढळली, तर अनेक मयत मतदारांची नावे अद्याप कायम आहेत. त्यामुळे बोगस मतदानाला वाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरिकांकडून तसेच निवडणूक निरीक्षकांकडून व्यक्त केले जात आहे.
मतदार पडताळणी मोहीम अपयशी?
गेल्या काही महिन्यांपासून महापालिका व निवडणूक विभागातर्फे मतदार पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात पत्ते व माहिती गायब असल्याने ही मोहीम प्रभावी ठरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. घर क्रमांक किंवा अचूक पत्ता नसल्याने अनेक मतदारांचे मतदान केंद्र कोणते हेच स्पष्ट न झाल्याने निवडणूक दिवशी हजारो मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा –पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? माजी महापौरांची गुप्त बैठक
शहरातील नऊ प्रभागांत पत्ते गायब
शहरातील नऊ प्रभागांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे पत्ते गायब आहेत. त्यात प्रभाग 21 मध्ये तब्बल 33 टक्के मतदारांचे घर क्रमांक नोंद झालेले नाहीत. प्रभाग 10 मध्ये 28 टक्के, प्रभाग 30 मध्ये 27 टक्के, तर प्रभाग 4 मध्ये 29 टक्के मतदारांच्या घराचा पत्ते नाहीत. प्रभाग 19, 20, 29, 5 आणि 6 या प्रभागांतही 26 टक्क्यांहून अधिक मतदारांचे पत्ते यादीत नसल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, अनेक मयत मतदारांची नावे मतदार यादीत कायम आहेत. तर, यादीत 92 हजारांपेक्षा अधिक दुबार नावे आहेत. अनेक मतदारांचे वय चुकले आहेत. ज्येष्ठ मतदारांचे वय 29 वर्षे दाखविण्यात आले आहे. त्या प्रकारामुळे बोगस मतदान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक समित्या आणि राजकीय पक्षांनी या त्रुटींवर तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशी अवस्था उघड झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, मतदारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.


