Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड महापालिकेने चुकीच्या पद्धतीने प्रभागनिहाय मतदार यादी तयार केल्याने महापालिकेच्या निवडणूक विभाागकडे मोठ्या संख्येने हरकती व सूचना दाखल करण्यात येत आहेत. दिवसेंदिवस हरकतीचा अक्षरश: पाऊस पडत आहे. मंगळवारी (दि.2) एका दिवसात एकूण 1 हजार 208 हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. आजअखेरपर्यंत तब्बल 8 हजार 88 हरकती महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत.
महापालिकेने पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदार संघाची मतदार यादी फोडून 1 ते 32 प्रभागांची प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली आहे. त्या यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि चुका आहेत. एका प्रभागातील मतदारांची नावे तसेच, यादी भाग दुसर्या प्रभागात जोडण्यात आली आहेत. काही माजी नगरसेवक तसेच, निवडणूक लढणार्यांची नावे गायब झाली आहेत. महापालिका कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे मतदार यादीचा घोळ होऊन गोंधळ उडाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक व नागरिकांकडून तक्रारी, हरकती, आक्षेप व सूचना मोठ्या प्रमाणात दाखल केल्या जात आहेत.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये तीन लाख 63 हजार मतदारांचा घर क्रमांक गायब! दुबार, मयत मतदारांची नावे कायम
सर्व आठ क्षेत्रीय कार्यालय व मतदार यादी कक्षाकडे मंगळवारी (दि.2) एका दिवसात एकूण 1 हजार 208 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. आज एका दिवसात ब क्षेत्रीय कार्यालयात सर्वांधिक 272 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. तर, 20 नोव्हेंबर ते आजअखेर तब्बल 8 हजार 88 हरकती, सूचना व आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. क क्षेत्रीय कार्यालयात सर्वांधिक 1 हजार 881 हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. अक्षेत्रीय कार्यालयात 1 हजार 513 हरकती आणि फ क्षेत्रीय कार्यालयात 1 हजार 164 प्राप्त झाल्या आहेत. ग क्षेत्रीय कार्यालयात 944, ह क्षेत्रीय कार्यालयात 618, ड क्षेत्रीय कार्यालयात 809, ब क्षेत्रीय कार्यालयात 753 आणि ई क्षेत्रीय कार्यालयात 310 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. मतदार यादीत दुबार नावाबाबत आत्तापर्यत एकूण 21 तक्रारी करण्यात आल्या आहेत. महापालिका निवडणूक विभागाने सुमोटो 132 हरकती दाखल करुन घेतल्या आहेत.


