पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने यावेळी १०५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असून, त्यासाठी अन्य पक्षातील “इलेक्टीव्ह मेरिट” असणाऱ्या माजी नगरसेवकांना पक्षात सामावून घेण्याची रणनीती आखली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १६ हून अधिक अन्य पक्षांतील माजी नगरसेवकांना लवकरच भाजपमध्ये प्रवेश देण्याची तयारी सुरू आहे. मात्र, हाच मुद्दा आता भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नाराजीचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे.
भाजपची रणनिती! पण कार्यकर्त्यांची नाराजी
अनेक प्रभागांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन पक्षाची पकड मजबूत केली असताना, बाहेरचे ‘जिंकणारे चेहरे’ पक्षात आणल्यास ‘आमचे काय’ अशी भावना या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. काहींनी याबाबत थेट नाराजी व्यक्त केली असली तरी, वरिष्ठांकडून ‘तुमचा विरोध म्हणजे शीर्षस्थ नेतृत्वाला विरोध’ असेच समजले जाईल, अशी अप्रत्यक्ष बोळवण केली जात आहे. विशेषतः वडगावशेरी, शिवाजीनगर, पर्वती या मतदारसंघात ज्यांच्या विरोधात सदैव लढा दिला.त्यांनाच भाजपमध्ये प्रवेश देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात असेल तर ‘आम्ही कसा प्रचार करायचा ‘असा सवाल भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
हेही वाचा – सोलापुरात भाजपचा मोठा राजकीय डाव! शिंदे आणि अजित पवार गटाला धक्का
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात आमदार पुत्राच्या भाजप प्रवेशाला निष्ठावंतांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ज्यावेळी या भागात पक्षाचे प्राबल्य नव्हते,त्यावेळी आम्ही झोकून देऊन काम केले. पक्षासाठी आजही काम करत असताना ‘बाहेर’चा उमेदवार कशासाठी आणि ‘तो’ उमेदवार या मतदारसंघातील आठ -नऊ जागांवर कोणा-कोणाला उभे करायचे हे ठरवत असेल तर आम्ही प्रचार कसा काय करायचा आणि आमचे काय ? अशी व्यथा येथील निष्ठावंतांची आहे. तर शिवाजीनगर मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांचे मताधिक्य वाढविण्यास जमेच्या ठरलेल्या राष्ट्रवादीतील ‘दादां’विरोधात निष्ठावंतांनी एकीची मोट बांधली असली तरी भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी ‘दादां’नाच अनुकूलता दाखवली आहे.
‘पर्वती’ मध्ये, माजी उपमहापौरांसह त्यांच्या घरात किती ‘तिकिटे’ मिळणार यामुळे भाजपचे निष्ठावंत धास्तावले आहेत.परिणामी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मनात उमटणारा हा असंतोष, आगामी निवडणुकीत भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो, अशीही चर्चा पक्षांतर्गत रंगू लागली आहे.


