Maharashtra Winter Session: महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन या वर्षी ८ ते १४ डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार असून, हे अधिवेशन फक्त एक आठवडाभराचे असेल. हा निर्णय आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आला आहे. सदर निर्णयाची घोषणा आधीच पावसाळी अधिवेशनाच्या बैठकीत विधानसभेच्या अध्यक्षांनी विधानसभेत केली होती, आणि आजची बैठक ही निर्णयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आयोजित होती.
विरोधकांच्या तक्रारी आणि नाराजी
फक्त आठवडाभराचे अधिवेशन ठेवल्याने विरोधकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. विरोधकांचा असा दावा आहे की, छोट्या कालावधीत सर्व गंभीर मुद्यांवर सखोल चर्चा होणे कठीण होणार आहे.
हेही वाचा – राज्य निवडणूक आयोगाविरोधात OBC महासंघ हायकोर्टात धाव घेणार; बबनराव तायवाडे यांची माहिती
या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार
या हिवाळी अधिवेशनात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर, तसेच भ्रष्टाचाराचे आरोप यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. सरकारने पॅकेज जाहीर केले असूनही, अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. मागील काळात विविध नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप समोर आले आहेत, हे मुद्दे विरोधक अधिवेशनात पुढे आणू शकतात.
हेही वाचा – ‘हा सावळा गोंधळ बरा नाही…’; न्यायालयाकडून निवडणूक आयोगाची कठोर शब्दात कानउघडणी
अधिवेशनाचा परिणाम
आठवडाभराच्या या अल्पकालीन अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ मर्यादित असल्याने विरोधक आता काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


